Senorita...




बराच वेळ कान देऊन ऐकत होतो. उतार चढ न करता , एकाच पट्टीत , शांतपणे कोणितरी कुणालातरी समजून सांगत होतं. पण परत समजलं कि भाषा अनोळखी आहे . आवाज पण नवीनच वाटत होता. कदाचित त्याच मुळं माझ्या अवतीभोवती उत्सुकतेचे वारे पसरले होते. त्या उत्सुकतेचे प्रदर्शन अगदी सहज होत असावे कि काय माहित नाही पण बाजुच्याने मला विचारले , “काय शोधत आहेस ? काही हरवलं आहे का ? ”. “छे छे, काय हरवणार , काही नाही ! ” म्हणुन मी त्याचा निरोप घेतला.
       उत्सुकतेच्या भरातच मी कधी माझी खुर्ची आवाजाच्या दिशेने सरकावुन घेतली मला समजलं नाही. कोण बोलतंय हे अजून पर्यंत समजलेलं नव्हतं. कपाटाच्या उघड्या दाराने हवी तितकी त्या बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडली होती. चेहरा पाहण्यासाठी मी खुर्चीवरूनच पाठीची कमान वाकवत होतो. समोर ठेवलेल्या कॉम्पुटरला डोकं लागल्यावर समजलं कि अजून पुढ जाता येणार नाही. वाकुनही त्या बोलणाऱ्या व्यक्तीचे फक्त हात दिसत होते. मी अजून थोडा वाकणारच, इतक्यात “ती” वळाली आणि तिने मी करत असलेल्या क्रीयाकलापाला पाहिले. कदाचित त्या उत्सुकतेची तिलाही चाहूल लागली आणि ती हसली. ( माझ्याकडे पाहून हसली असे म्हणायला काही हरकत नाही ).
       तिच्याकडे पाहून समजायला वेळ लागला नाही कि ती दुसऱ्या देशातून आली होती. तिचा देश म्हणजे माझ्यासाठी, शाळेत शिकलेल्या भूगोलाच्या पुस्तकातल्या नकाशावर पाहिलेला आणखी एक देश होता. विदेशातून आलेली मुलगी पहिल्यांदाच पाहतोय अशातला काही भाग नव्हता पण तिची बातच वेगळी होती. तिच्या त्या पहिल्यांदा ऐकलेल्या आवाजाने जणू माझ्यावर प्रभुत्वच जमवले होते. ज्यामुळे आपोआप तिच्या हालचालींवर माझे लक्ष जाऊ लागले..
आणि तिथून सुरु झाला ऑफिस मध्ये आलेल्या नवीन विलायति मुलीचा पाठलाग J.!!!!
       नवीन वर्ष नुकतेच सुरु झाले होते. नाताळच्या आणि नवीन वर्ष्याच्या सुट्ट्यानंतरचा तो पहिलाच दिवस होता. बरेच लोग गावी गेल्यामुळं ऑफिसात जास्त लोक उपस्थित नव्हते. त्यात माझ्या Section ला  मी एकटाच होतो. काचेचा मोठ्ठा दरवाजा “खुलजा सीम सीम” न म्हणताच आपोआप आम्ही समोर आल्यावर उघडायचा. आत आल्यावर सवय लागल्याप्रमाणे त्या भल्यामोठ्या खोलीच्या अगदी विरुद्ध कोपऱ्यात माझी नजर जायची, जिथे ती बसायची. तशी नजर त्यादिवशी पण गेली. कीतीही दिवस झाले तरी काही लोक बदलत नसतात ना त्यापिअकी ती एक होती. १० दिवसांच्या मोठ्या सुट्टी नंतर ती आज पण तितक्याच एकाग्रतेने computer कडे पाहत होती जितकी ती सुट्ट्यांआधी पाहायची. आणि नेहमी प्रमाणे तिने आज पण माझ्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यात चांगली गोष्ट एकच होती की ती पण तिकडे एकटीच आली होती. म्हणजे पूर्ण खोलीमध्ये आम्ही दोघेच. मी खोलीच्या या कोपऱ्यात बसलेला आणि ती अगदी विरुद्ध असलेल्या दूरच्या कोपऱ्यात.

       त्या दिवसापर्यंत मी बऱ्याचदा तिला बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्नांना फळ मिळाले नाही. आपल्या देशातल्या मुली विदेशातल्या मुलींना “फिरंगण” म्हणतात असे आवर्जून सांगावे वाटेल. या दोघींमध्ये नेहमी एका शर्यतीची धुमाकुळ चालली असते कि काय याची मला शंका येते. ती कशाची शर्यत असेल ते त्यांनाच माहित...सांगण्याचा मुद्धा हा कि, तिला बोलण्यासाठी मला माझ्या इतर मैत्रिणींनी मदत तर केलीच नाही उलट मलाच सुनावले कि “ती इथे राहाण्यासाठी नाही आली अक्षय , जाईल ती एके दिवशी”
       ऑफिसातल्या कॅन्टीन चे दार अगदी माझ्या बाजूच्या भिंतीलाच असल्यामुळे मला तिच्या चहा आणि नाश्त्याच्या वेळा पाठ होऊन गेल्या होत्या .ती चहा साठी आल्यावर आपण जाऊन बोलू असे मनाशी ठरवले होते. बोलण्याची सुरुवात नेमकी कुठल्या वाक्यांनी करायची याची भरपूर आवर्तने मनातल्या मनात झाली होती. सुरुवातीचा अर्धा एक तास मी वाट पाहत होतो. तिच्या चहाची वेळ झाली पण ती जागेवरून उठली नाही. माझ्या जागेवरून तिच्या table वर ठेवलेले bread sandwich पाहून लक्षात आले कि ती नाश्तापन जागेवरच करणार आहे. तिने sandwich खाताना क्षणभर मला मीच sandwich झालेला दिसलो  इतका रमजे पर्यंत तिच्याकडे माझे लक्ष होते. नाश्ता झाल्यावर परत ती कामाला लागली.
       तिचा नाश्ता झाला आणि मलाही भूक लागली. नेमका त्याच दिवशी नाश्त्यासाठी बाजूच्या कॅन्टीन ला न जाता मी नवीन कॅन्टीन ला जाऊन आलो. जागेवर येऊन बसणारच इतक्यात ती  हातात चहाचा कप घेऊन माझ्या बाजूच्या कॅन्टीन मधून बाहेर आली आणि जागेवर जाऊन बसली . “ गेला...हा पण chance गेला ” म्हणत मी कामाला लागलो. त्यादिवशी तिच्या माझ्यात अशीच चुकामुक होत गेली आणि मी तिला भेटू शकलो नाही . “उद्या नक्की तिला भेटु ” असे स्वतःशीच म्हणत मी घराकडे निघालो आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागलो.
       तिच्या मागेच खिडकी होती. खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने चमकणारे तिचे सोनेरी केस पाहणे मी क्वचितच विसरलो असेल. अगदी हात लावुन बसल्यावरपण लाल होणारा तिचा चेहरा आणि त्या गोऱ्या रंगला शोभणारे तिचे सोनेरी केस यांची अप्रतिम जोडी होती. तिच्या चेहऱ्याला शोभतील असे कोरीव डोळे , लहानच पण टोकदार नाक , वाऱ्यानिपण उडून जाईल असा frameless चष्मा, सडपातळ लांब बोटांनी केसांना सावरणारे तिचे गोरे हात , गुलाबी छटा असलेले गाल , ५ फूट उंची , नेहमी jeans आणि formal shirt चा तिचा पेहराव, २२ -२३ वर्षांची ती आणि तिचा साधेपणा.....हे सगळं पाहण्यात कधी सहा महिने निघुन गेले कळालेच नाही...
       तिला बोलण्यासाठी दुसऱ्या दिवशी रोजच्या पेक्षा लवकर मी तयार होऊन ऑफिसात पोहोचलो. दरवाजा उघडला आणि माझे लक्ष तिच्या table कडे गेले. तिची खुर्ची रीकामीच होती. ती अजुन आली नसेल म्हणून  मी वाट पाहत बसलो. काल नसलेल्या इतर दहा बारा लोकांनी आज आपले चेहरे दाखवले. नाश्त्याची वेळ निघुन गेली आणि दुपार झाली. ती अजून आली न्हवती. जेवणाची सुट्टी झाली , मी canteen कडे एक चक्कर टाकली, ती तिकडे न्हवती . तिच्या ठराविक एक दोन मैत्रिणीच्या section ला पण जाऊन आलो , तिकडे पण ती न्हवती. भुकेनी वेळेची आठवण करून दिली , पण आज परत चुकामुक होऊ नये म्हणून मी माझी जागा सोडली नाही.
       तितक्यात तिच्या section चा  माझा एक मित्र जवळ आला. अश्याच गप्पा मारू लागला. सुट्ट्यांबद्दल सांगू लागला .त्याला थांबवतच मी त्याला तिच्या बद्दल विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तराने पोटातले कावळे जणू सैरावैर झाले. ज्याची भीती होती तेच झाले. काल तिचा ऑफिसातला शेवटचा दिवस होता...सहाच महिन्यासाठी ती इथे आली होती हे समजले...क्षणात पापण्या ओलावल्या. सहा महिने रोज दिसणारी ती, पहिल्याच दिवशी माझ्याकडे पाहून हसणारी ती, न चुकता चहाचा कप माझ्या बाजूने नेणारे ती, परत कधीच नाही दिसणार या विचाराने मन सुन्न झाले...ती गेली याच्या दुःखापेक्षा तिचे मी नाव पण विचारले नाही याचे जास्त दुःख वाटत होते.
दुसऱ्या दिवसापासुन परत आपले काम आणि आपला computer यापेक्षा दुसरीकडे लक्ष देण्यासारखे विशेष काहीच नाही असे वाटू लागले ....आणि असेच पुढे चालू राहिले.....
      

Senorita... Senorita... Reviewed by Akshay on 8:38 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.