करुणा



दुपारची वेळ होती , भर उन्हात करुणा भांडे घासायला बसली होती. नेहमीप्रमाणे “आज थोडे जास्त भांडे आहेत हं करुणा , पाहुणे आले होते ना घरी ” म्हणत मालकीणीने  भांड्याचा ढीग तिच्यासमोर टाकला. ओलावलेल्या पापण्या साडीच्या पदराच्या फाटक्या कोपऱ्याने पुसत “ जि मालकीन , धुते कि ” म्हणुन करुणा हसली. करुणाला चेहऱ्यावर “धुते कि” म्हणताना हासु आणण्यासाठी स्वतःसोबत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव भांड्याचा डोंगर समोर टाकणाऱ्या मालकीणीला नक्कीच न्हवती.
      महिन्याचा आखेरचा अठवडा होता. दोन दिवसांआधी मारहाण करून नवऱ्याने सारे पैसे काढुन घेतले होते. त्यादिवसापासून घरात चुल पेटली न्हवती. मालकीणीने दिलेल्या शिळ्या तुकड्यांवर दोन दिवस गेले. पण “आज काय?” हा प्रश्न तिला काट्यासारखा रुतत होता. तिच्या दोन पिल्लांचे पोट भरावे म्हणुन ती शिळ्या तुकड्यांचे दोनच हिस्से करायची आणि लेकरांना द्यायची. स्वतः मात्र उपाशी ! आज तिसरा दिवस होता. केवीलवाणी लेकरं घरात वाट पाहत दाराला बसली असतील याची काळजी तिच्या काळजाला कातरत होती. सकाळ पासुन चार घरी जाऊन आली पण शिळं आन्न पण तिला आज मिळालं नाही. “पैसे उद्या देते, उद्या पूर्ण होतो न तुझा महीना” म्हणत मालकीणीने करुणाच्या आशेला पूर्णविराम दिला. तीन दिवसांची उपाशी करुणा अनवाणी पायाने घराकडे धावत सुटली... 

      काही वर्षांआधी लग्न न झालेली हीच करुणा बापाला घरात जड वाटू लागली. पोरगी पोसली जात न्हवती म्हणुन त्याने खोट्या नौकरीच्या बढाया मारणाऱ्या माधव सोबत तिचं लग्न लाऊन दिलं. खेड्यातून माधवने तिला शहरात आणलं. नौकरी तर नाहीच पण पत्ते, दारू अश्या भयानक राक्षसांच्या जाळ्यात तो अडकला होता. त्याच्या माणुसकीवर अमानुष पणाचा लेप चढला होता. रोज दारू पिऊन मारहाण, रस्त्यावर खेचुन शिवीगाळ, अंगभर ओरखडे हे सगळं करुणाच्या आयुष्यात विधिलिखित असल्याप्रमाणे घडत होतं . त्यात दोन मुलं झाली आणि करुणानि सुखाच्या कर्दन काळाला स्वतःला अर्पण करून टाकलं. पोटाशी एक आणि पाठीशी एक लेकरू घेऊन ती घरोघर कामाला जायची. व्यसन असल्यामुळं माधवला काम मिळायचं नाही आणि मिळालं तरी ते टिकायचं नाही. करुणाच्या कष्टाची कमाई दारूच्या बाटलीतून मग माधवमध्ये वाहात असत.
      त्यारात्री करुणाने डब्ब्याच्या तळाला असलेल्या पिठाची गंजी करून लेकरांना भरवली. लेकरांना गच्च पोटाशी आवळून ती झोपी घालत होती. लेकरांच्या रिकाम्या पोटांकडे पाहून रडणाऱ्या करुणाच्या डोळ्यातल्या पाण्याला फक्त ती रात्र साक्षिदार होती. सकाळ होताच मुलं उठण्याच्या आधी ती कामाला गेली आणि दुपारच्या आत पैसे घेऊन घराकडे परतली. चुल पेटवली. लेकरांनी चुली भोवती रिकाम्या ताटांची पंगत मांडली. भाताच्या शिजण्याच्या आवाजाने करुणाच्या मनाला थोडीशी शांतता दिली. भाताचं पातेलं काढुन जमिनीला टेकावनारच इतक्यात दरवाज्याची धड धड ऐकू आली. तीन दिवसांनी घरी आलेला माधव दाराबाहेर तांडव करत होता. करुणाने दरवाजा काढला. तोल सावरत माधवने तिला धक्का मारला आणि ती जमिनीवर पडली. “मला सोडुन खाता काय रे कार्ट्यांनो...कोणी खाणार नाही आज घरात” म्हणत त्या राक्षसाने भाताच्या पातेल्याला लाथाळले आणि करुणाच्या डोळ्यांना पाण्याचे सुख दिले.............
     
करुणा करुणा Reviewed by Akshay on 10:10 AM Rating: 5

2 comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.