वाचवाल का रे तिला कोणी ??



“उठ उठ” म्हणत ती काल स्वप्नात आली . घाबरलेली दिसत होती . अंगावर ओरखडे , मळालेली साडी , मोजकेच अलंकार , चेहऱ्यावर काळंकी आणि डोळ्यातून शांत वाहणारे पाणी असा तिचा अवतार होता. मी विचारले “ कोण तू ? ” .
 “ओळखलं नाही ना तू पण मला ? ” म्हणत ती मागे वळली आणि खाली मान घालून चालायला लागली. तिच्या मागे जाऊन मी तिला थांबवले .
 “कोण आपण ? काय झालय आपल्याला ? का रडताय ? मी काही मदत करू का ?”. तिने मान वर केली , आणि हसली. म्हणाली ,

 “ मदत करशील माझी ? वेळ आहे तुझ्याकडे ?. नाही रे जमणार तुला. वेळ निघून गेलीय एकट्यानी मदत करण्याची. खूप सारे लागतील. साधे, सरळ वागणारे..”
      तिच्या आवाजात चिंता जाणवत होती . हताश होऊन निराशेच्या चाक्रव्हुहात तिने स्वतःला अडकवलं होतं हे स्पष्ट दिसत होतं. तिची हि अवस्था कोणी केली असेल हा विचार मला आतून रुतत होता. इतक्यात ती म्हणाली ,
“ अस्वस्थ होऊ नको , विसरून जाशील थोड्या वेळात. खूप सारे विसरून जातात .” “पण...”
क्षणभर थांबली आणि म्हणाली ,
“पण माझा एक निरोप तू सगळ्यांना दे”. ती बोलायला लागली. “ माता म्हणतोस ना रे तू मला , मग इतक्या लवकर विसरलास ? हो मी भारत माता !! तू मला पाहिलं असेल. प्रतिमेत ! एक मोठ्या साहेबाच्या कार्यालयात भिंतीवर लटकवलेली प्रतिमा. केशरी साडी , हातात तिरंगी झेंडा , अलंकारांनी भरवलेली , सिंहावर बसलेली. अशी होते मी. त्या प्रतीमेसारखीच ! माझं ते रूप आणि आजच रूप यामध्ये जास्त वर्षाचं अंतर नाहीये . गेल्या शंभर एक वर्षात मी माझ्या त्याच अस्तित्वाला , प्रतिमेला एकटीच जपतीय. पण मला आता भीती वाटतीय . माझ्या अस्तित्वाच्या सूर्याचा अस्त मला बघवत नाहीये. मला माझी चिंता नाही रे , पण माझ्या करोडो लेकरांची येणारी परिस्थिती मला चिंतीत करतीय. इतक्या लेकरांचे मातृत्व स्वीकारताना मला काहीच वाटले नाही पण आज हि भीती मला बेचैन करतेय. माझ्या लेकरांच्या सुखासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे . पण ते सुख आहे तरी कशात तेच कळत नाहीये मला . मला माझ्याच लेकरांची भाषा समजत नाहीये. माझीच चूक आहे ”
      ती थांबली . तिच्या चिंतेची तीव्रता आणि डोळ्यातल्या पाण्याचा ओलावा तिच्या आवाजात उतरला होता. परत सांगू लागली , “काही वर्षांपूर्वी इथेच दाट जंगले होती . अगदी थोडा सूर्यप्रकाश त्या झाडांमधून माझ्या अंगावर यायचा . त्या जंगलामध्ये खुप सारे प्राणी पक्षी माझ्या अंगाखांद्यावर खेळत असत. पहाटेच्या त्यांच्या चीवचीवाटीने माझ्या दिवसाची सुरवात व्हायची. आणि कुठे एका हरिणीच्या पोटात दुमडून झोपत असलेल्या पाडसाला पाहत तर कधी चोचीने पिल्लांना घास भरवत असलेल्या चिमणीला पाहत दिवस मावळायचा. मावळत्या सूर्याचा निरोप घेत मग मी चंद्राची वाट पाहत असे . पण आज चित्र बदललंय. सूर्याच्या अतिनील किरणांनी मी भाजली जातीय .त्या पक्षांच्या चीवचीवाटीची जागा मोठ्या मोठ्या यंत्रांनी घेतलीय . त्यांचा मोठा आवाज माझ्या कानात रात्रंदिवस घुमतो . त्यांचे हादरे माझ्या काळजापर्यंत पोहोचतात. तरी मी बोलत नाही .मोठमोठ्या कृत्रिम हातांनी माझ्या शरीराची लक्तरे काढली जातात .भुयार मार्ग , विहिरी काढून माझ्या अंगाची चाळणी केली जाते. माझ्यातल्या हिरे , मोती , खनिजांना शोधून शोधून काढले जाते . तरी मी काहीच बोलत नाही . उंचावरून पडणारे धबधबे , नद्या , झुळझुळ आवाज करत वाहणारे हजारो झरे यांची सवय होती मला. त्या नद्या जणू गायब झाल्यात त्यांचे पाणी अडवून मोठमोठे प्रकल्प बांधले जातात. झरे बंद पाडले गेलेत , नद्यांच्या नाल्या झाल्यात.
मेणकापडे , काचाच्या वस्तू , प्लास्टिकचे तुकडे माझ्या अंगांगात पसरलेत . माझ्या उपजावू जमिनी रासायनिक खतांमुळे नापीक झाल्यात . त्यातून पिकणाऱ्या धन्याला रसायनाची चव येतीय . ते रसायने पोटात जावून माझ्या लेकरांची शरीरयष्टी , आयुष्य मर्यादा दिवसेंदिवस कमी होत जातीय . हेच रसायनं , दुषित पाणि आणि अविघटक पदार्थ खाऊन एकेका प्राण्यांच्या , पक्षांच्या प्रजाती शेवटला आल्या आहेत. हे नाही बघवत रे लेका मला.
      एखाद्यासाठी एखादं वाहन घेणं खूप मनाचं ठरत असेल इथे . पण त्या वाहनाचा माझ्या अस्तित्वाला काय फायदा होतो रे ?? त्याला लागणाऱ्या इंधनापासून ते त्यापासून होणाऱ्या प्रदुशानापर्यंत सगळीकडे माझेच नुकसान आहे      .”
      यानंतर ती थांबली . तिच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं . तिची तक्रार नव्हती पण शेवटी मायचं ती , ती स्वतः तिच्या लेकरांना पुरवठा जात नसावी असा तिचा समज . सगळ्या गोष्टी समोर होत असताना ती काहीच करू शकत नाही याचा त्रागा. यानंतर तिला काहीतरी आठवलं .गच्च डोळे मिटुन डोळ्यात दाटलेल्या पाण्याला तिने सुटका दिली .
“या शारीरिक त्रासाच्या गोष्टी आहेत , त्या मी सहन करेल. पण जेंव्हा मानसिक त्रासाच्या आठवणीचं ढग दाटतं ना तेंव्हा डोळ्यातल्या पाण्याशिवाय माझ्याकडे पाहण्यासारख काहीच राहत नाही.
माझ्या मुलींचच बघ नं....”
इतकंच म्हणाली आणि तिचं रडणं अगदी अनावर झालं. मी आधारासाठी हात पुढे करत असताना पाहून ती मागे सरकली आणि स्वतःला सावरलं.
“ माझ्या मुली ...त्याचं तर नशीबच खोटं. डोळे उघडण्याच्या आधीच त्यांचा नाक तोंड दाबून जीव घेतला जातो . जन्माला आलीच तर सगळ्या समाजाच्या नजरा तिला रात्रंदिवस टोकत असतात.लहान लहान चीमण्यांपासून त्यांच्या आयापर्यंत एकीलाही स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री नाही . सकाळी घरातून बाहेर गेलेली मुलगी रात्री घरी वापस येईपर्यंत तिच्या आईच्या जीवात जीव नसतो. या कोवळ्या जीवांना स्वतःच्या स्वार्थासाठी नराधमांकडून कुस्करून टाकलं जातंय. काय रे त्यांचा गुन्हा ? मुली आहेत हा कि अमानुष बलात्काऱ्यांसारख्या दगडी काळजाच्या नाहीत हा ?? अभिमानानं वर मान करून बिनधास्त कधी जगावं रे माझ्या पोरींनी ?? तासातासाला एक तरी कळी खुलण्याच्या आधीच तोडून टाकली जातीय. काय उत्तर देऊ रे मी त्यांना ? त्या बलात्कार करणाऱ्या माझ्याच लेकरांना मी संस्कार नाही दिले म्हणू कि त्यांना त्यांच्या कर्तुत्वाची शिक्षा नाही दिली म्हणू.......मला समजत नाहीये मी माझ रड्गाराण कोणाला सांगु. माझ्या तक्रारींसाठी कुठल्या पुलिस चौकीत जाऊ . कोणत्या न्यायालयात किती जणांवर कारवाई करू .कोणत्या न्यायाधीशाच्या आणि वकिलाच्या हातापाया पडू , कोणत्या मंत्र्याला कशाचं आमिष दाखऊ..काहीच नाहीये रे माझ्याकडे.. कोण ऐकेल माझं ? जिथे तुमचीच हाक कोणी ऐकत नाही तिथे माझा आवाज कोणाला ऐकू जाईल. त्यांच्या समोर राहणार्‍या निराधार गरीब लोकांची अवस्था त्यांना दिसत नाही तिथे माझी अवस्था कोणाला दिसेल ?
माझ्या आयुष्यातले हिरे , मोती , पैसे म्हणजे तुम्हीच रे . राम , कृष्ण , अर्जुन , कर्ण , लक्ष्मी , सरस्वती , सीता , अनुसया , ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , विठ्ठल , पाणिनी , व्यास , कणाद ,  रामदास , कालिदास , चाणाक्य , विवेकानंद , आर्यभट्ट , शिवाजी , जिजाऊ , सावित्री फुऊ , गांधी , सावरकर , टिळक , चंद्रशेखर आझाद , भगतसिंग , राणी लक्ष्मीबाई , अब्दुल कलाम , लता मंगेशकर , कल्पना चावला , हरिप्रसाद , रामदेव , रविशंकर या सगळ्यांचा जन्म इथेच झालाय. यांच्यावर पण मी तेच संस्कार केले होते जे मी तुमच्यावर करते. मग बाकीच्या लेकरांना संस्कार करायला मी कुठ मागे पडले...???
हजारो भाषा , त्या भाषांमधून लिहिलेले हजारो ग्रंथ , वेद , उपनिषदे , रामायण , भगवद्गीता , जगातली सगळ्यात जुनी संस्कृती , ज्ञानाचे असंख्य विश्वकोश , जगातले सगळ्यात अनुकूल वातावरण , उपजावु जमीन , अगदी ठळक तीन ऋतु , सगळ्यात जास्त युवकांची संख्या , असंख्य विद्यापीठे , जागतिक बाजारपेठेतली मोठी उलाढाल ...अश्या कितीतरी गोष्टीने मी सजवलेली असतानाही भ्रष्टाचार, भूखमार , प्रदूषण , चोऱ्या , लबाडी , दूषित राजकारण या मुळं माझी मुलं मला सोडून दुसर्‍या देशात जातात ..त्यांना का जावे लागत आहे माझ्यापासून दूर ??? ”
इतकं बोलून ती अचानक गायब झाली आणि मला जाग आली...अगदी घामाघूम झालो होतो...तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी परत आठवल्या . मा‍झ्याही डोळ्यातून पाण्याचे थेंब बाहेर पडे . ते एक स्वप्न होतं या पेक्षा तो भारत मातेचा साक्षात्कार होतं, तिच्याकडून मला मिळालेली सूचना होती...तिची ही अवस्था होणार आहे हे तिला मुद्दाम हून मला सांगायचे होते...
ती प्रश्नांवर प्रश्न विचारात गेली. तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं...तुमच्याकडे आहे का हो ? वाचवाल का हो तिला ?


वाचवाल का रे तिला कोणी ?? वाचवाल का रे तिला कोणी ?? Reviewed by Akshay on 10:55 AM Rating: 5

1 comment:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.