सदरील कथा काल्पनिक आहे परंतु
वास्तविक जीवनाशी तिचा खूप जवळून संबंध आहे.. कथेच्या उत्तरार्धात हाथ थरथरत कथा
पूर्ण करावी लागली इतके विचार डोक्यात गोंधळ घालत होते. कथेमध्ये बरेच प्रसंग
आखण्याचा प्रयत्न केला आहे. मला यातून काय म्हणायचे आहे किंवा दर्शवायचे आहे यापेक्षा
वाचकांना यातुन काय उमजले हे मला जाणून घ्यायला आवडेल. वाचकांकडून प्रतिक्रिया
आपेक्षित आहे...
चुटकी
डोक्यावर एक गाठोडं , दोन हातात दोन पिशव्या , खांद्याला एक मळकट लांब बंदाची
शबनम, ढगळा खादी कापडाचा सदरा, गुडघ्याला फाटलेली विजार, चिखलात भिजुत वाळली असावी
अशी दोन बंदांची चप्पल अशा अवतारात म्हादू रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडला तेंव्हा
येसू त्याच्या मागेच होती. एक सारखी न नेसलेली साडी, नाजुक, उंच आणि काळवट त्वचा
अशी शरीरयष्टी, डोक्यावरून पदर, त्यावर बांबूच्या पट्ट्यांपासून विणुन बनवलेले
मोट्ठे टोपले, टोपल्यात काही भांडी, रॉकेल (केरोसीन) वर चालणारा स्टोव्ह, एक छोटा
लाकडी देवारा इत्यादी घरकामाच्या वस्तु , असा तिचा पेहराव होता. एका हाताच्या
खांद्यावरून आणि दुसऱ्या हाताखालून जाणाऱ्या मळकट पांढऱ्या कापडात पाच एक महीन्याचं
लेकरू तिच्या पोटाशी बांधलं होतं आणि एक छोटी मुलगी तिच्या पदराला धरून चालत होती.
म्हादू मुळचा चाळीसगावचा होता.
देशमुखांच्या वाड्यावर आणि शेतावर मजुरी करण्याचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय
होता. वर्षा दोन वर्षांपासुन सुरु असलेल्या दुष्काळामुळे देशमुखांच्या शेतातले
उत्पन्न कमी झाले आणि परिणामतः म्हादूला शेतावर काम मिळेनासे झाले. सहा वर्षाची
चुटकी आणि नुकतेच जन्मलेलं त्याचं मुल यांच्यासह त्याची बायको येसुचाही मुलभूत
गरजांचा प्रश्न रोज म्हादुच्या काळजाला कातरत असे. दुसरीच्या वर्गापर्यंतच
शिकल्यामुळे शहरात पण काम मिळेल का याची खात्री त्याला नसायची. “अरं म्हादया शहरात कोणाला बी काम मिळतंय
रं..फकस्त मिळल ते काम करायची तयारी फाईजी बघ.” असा कानमंत्र गावच्या पारावर
बसणाऱ्या दिगंबर काकांनी दिला. “बर दिगु काका..आमदा गावात काम मिळणार नाही हे तर
खरंय बघ. या इतवारीच मी येसुला घेऊन जातो शहराला. माय असती तर तिला लई ख़ुशी झाली
असती बघ काका मी शहरात नौकरी करणार म्हणुन..”
म्हादू चा परिवार फक्त तो आणि येसू
इतकाच होता. दोन लहान लेकरांना सोडून त्याचं गावात कुणीच नव्हतं. राब राब राबून चार
पैसे त्याला मिळायचे . त्यातच काय ती घरात चूल पेटायची. गावच्या वेशीला एका छोट्या
झोपडीत तो राहायचा. उधारी असेलेल्या सावकाराचे जाच , ढोर कामाचे कष्ट , रोजचा पोटाचा
प्रश्न , उपासमार या सगळ्यांना कंटाळून निराधार झालेल्या म्हदुला कित्तेकदा आत्महत्या
हाच शेवटचा उपाय दिसायचा. एकदा येसूचा शेतात दुपारच्या वेळी झाडाखाली डोळा लागला..म्हादुने
जवळ पडलेला जनावराचा रोपखंड उचलला आणि झाडावर बांधला. तो स्वतःला त्या रोपाच्या
हवाली करणार तोच येसुने त्याचे पाय पकडले आणि गयावया करू लागली.. “ धनी, काय करताय
व्ह हे, कुठं जाईल व्ह ही येसू तुम्हाला सोडून , तुम्ही कसे ठवाल तशी राहीन पर असल
हे काई बी मनात आणू नका. तुम्हाला माझी आन हाय. आपल्या लेकरांची आन हाय” म्हणून तिने
हंबरडा फोडला..त्यानंतर शहराकडे जाने हाच एक रस्ता त्याला दिसायचा..
म्हादूचं कुटुंब शहरात आलं. म्हादू
, येसू आणि चुटकी कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत होती.. गर्दी , गाड्या , गोंगाट
, उंच इमारती , एकदम चकमक दिसणारे लोकं , सगळं पाहून यांना वेगळ्या जगात आल्या
सारखं वाटत होतं.. “शहरात आलोय खरे पण पुढे काय करायचं?” हा प्रश्न म्हादूच्या मनात
घोळत होता. ती
रात्र त्यांनी रेल्वे स्थानकावरच काढली..हळूहळू माहिती काढत , येसुला आणि लेकरांना
कुठेतरी ठेवून म्हादू गावभर कामाच्या शोधात फिरायचा. काहीतरी काम मिळेल याची त्याला
आता खात्री झाली होती. चांगले काम मिळेल पर्यंत म्हदुने एक छोटा व्यवसाय सुरु
करायचे ठरवले. शहरात फुलं विकण्याचे काम त्याला आवडले. गल्लो गल्ल्या फुलाचे टोपले
घेऊन म्हादू आणि येसू फुले विकू लागली..कधी बागेच्या बाहेर, कधी एखाद्या मंदिराजवळ
तर कधी रस्त्यावर ते फुले विकायची.
उन्हाळ्याचे
दिवस होते. म्हादूला अजुन हवे तसे काम न मिळाल्याने तो फुलेच अधिक मेहनतीने
विकायचा. एके दिवशी रस्त्याच्या कडेला एका सिग्नल जवळ म्हादू चे कुटुंब बसले होते.
सिग्नल लागला कि येसू धावत थांबलेल्या गाड्यांजवळ जायची आणि हातातली गुलाबाची फुले
विकण्याचा प्रयत्न करायची. आईकडे बघुन चुटकी पण सिग्नल वरती फुलांचा गुच्छा घेऊन
जाण्याचा हट्ट करायची. जास्त रहदारीच्या ठिकाणी सहसा चुटकीला रस्त्यावर जाण्यासाठी
परवानगी नसायची. येसूला सकाळपासून कणकण होती. अंग तापले होते. त्यात उन्हाळ्याचे
दिवस आणि सूर्य डोक्यावर आला होता..येसू घटकाभर खाली टेकली. म्हादू गुलाबांच्या फुलांनी
भरलेल्या टोपलीवर पाणी शिंपडत होता. चुटकी तिला कुठेतरी सापडलेल्या एका बाहुली सोबत
खेळत बसली होती. डावा पाय , उजवा हात आणि दोन्हीपण डोळे नसलेल्या बाहुली सोबत खेळण्यात
इतकी गुंग होती जशी तिने तिच्या मैत्रिणीशी खेळावं..
एक-दोन
सिग्नल लागून गेले. येसू ला जागेवरून उठता येत नव्हत. “धनी , पाठ लई धरलीय बघा..आजच्याला
काम व्हणार दिसत न्हाय. यवढ लेकरास चार घास भरवाल का ?” म्हणत येसुने लहान बाळाला
म्हादू कडे दिले. म्हादू बाळाला मांडीवर घेऊन थोड्याशा सावली मध्ये घास भरवू लागला.
सिग्नल चा लाव दिवा लागला आणि चुटकी ने जवळ पडलेले गुलाबाचे फुल उचलले आणि धावत
गाड्या उभ्या होत्या त्या दिशेने गेली..गुलाबाची फुले पुढे करून “फुलं घ्या ताई ,
फुलं घ्या दादा” म्हणत थांबलेल्या गाड्यांमधून वाट सारत पुढे जाऊ लागली. सिग्नल सुटला
आणि चुटकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच उभी राहिली. गाड्या परत जोराने सुटल्या आणि
तिला वापस येता आले नाही. म्हादू दुरून आपल्या लेकीच्या सावळ्या रुपाकडे पाहत
होता..इवलसं लेकरू ज्या तत्परतेने आणि उत्साहाने लोकांपुढे फुले नेत होतं ते पाहून
म्हादूच मन भरून आल. त्याला गहिवरून आलं आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं. येसू बाजूला
बसून बाप लेकीच्या अमाप प्रेमाला साक्ष देत होती.
परत सिग्नलचा
लाल दिवा लागला. सगळ्या गाड्या थांबल्या . चुटकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजू कडून
परत येऊ लागली. तिचा हात फुलांसोबत पुढेच होता. ती नजरेनेच लोकांना “फुलं घ्या” असं
खुणवत होती. हिरवा दिवा लागणार इतक्यात चुटकी म्हदुच्या दिशेने पळायला लागली. म्हादू
तिच्याकडे पाहून ओरडतच होता इतक्यात आपल्याकडे पळत येणारी चुटकी क्षणात गायब झाली
हे त्याला कळल. काय झालं कुणाला कळण्याआधीच म्हादू ने हंबरडा फोडला. ताडकन उठून तो
रसत्यावर आला न आला तोच कारच्या चाकाखाली त्याचा पाय सापडला. तिकडे त्या इवलुश्या
जीवाला सिग्नल तोडून तुफान धावणाऱ्या एका दुचाकी वाल्याने तीन एक मीटर अंतरावर फेकून
दिले होते. रस्त्यावर तिच्या हातातली फुले पसरली होती..जागेवरच किंचाळत तळमळ करत
म्हादू सरपटत चुटकी कडे गेला..येसूने चुटकीला हातात धरले होते..
आक्रांत
करत अगदी भान विसरून म्हादू आणि येसू रडत होते..रस्त्यावर घोळका जमा झाला..गर्दी
मध्ये म्हादू च कुटुंब नको अशा अवस्थेत रस्त्यावर लोळत होतं. म्हादू सुन्न झाला
होता..रडत रडत त्याला त्याचं वाक्य आठवलं “माय असती तर तिला लई ख़ुशी झाली असती बघ काका ....”
काळाने त्या पिल्लाला
त्यांच्यापासून दूर नेलं होतं. दुचाकीस्वार कोण होता, कुठे गेला कुणास ठाऊक नाही.
फुले विकणाऱ्या एका गरिबाचे कुटुंब आहे पाहून लोक आपापल्या कामाकडे वळत होते..नवीन
लोकं येऊन पाहत होते..येसू चुटकीला छातीला आवळून रडत होती.....
----समाप्त----
चुटकी
Reviewed by Akshay
on
2:18 PM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....