सहजच मला माझी "पाटी" आठवली..







आज सहजच मला माझी “पाटी” आठवली. हो शाळेतली पाटी. आयताकृती , लाल रंगाच्या प्लास्टिकच्या कडा , चारही कोपरे गोल झालेले...अगदी जशी च्या तशी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. त्या पाटीवर जीवापाड प्रेम करणारा मी पण आठवलो. गोल गोरा चेहरा आणि त्यावर गोल काळे डोळे , शेंडा हरवलेले नाक , सुजल्यासारखे गोल गोल गाल , पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी, दोन खटके असलेले दप्तर, त्यात दोन आडवे आणि दोन उधे असे रकाने, आडव्या रकान्यात पाटी आणि उभ्या रकान्यात खडूचे तुकडे आणि पाटी पुसायचा एक कपड्याचा तुकडा...हे सारे काळासोबत हरवलेले बालविश्व आठवत गेले. विचारांच्या प्रवाहाचा वेग मग कमी काही झालाच नाही...त्या प्रवाहासोबत मीपण वाहून गेलो...परत बालपणी गेलो...

      सकाळचे ७.२५ हि वेळ मी कदाचितच विसरेल. त्या वेळेला शाळा भरल्याची घंटा वाजायची. वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी मग जाम धडपड केली जायची.  माझ्या शाळेत जाण्यासाठी आईची पण तितकीच कसरत असायची . शाळेचे कपडे घालने , केस विंचरून पाठीवर दप्तर अडकावन्यापासून पायात चपला घालण्यापर्यंत आईची धावपळ तितकीच असायची. तिथून सुरु व्हायचा शाळेचा प्रवास. रोज एका मित्रासोबत धावत शाळेला जाण्याची शर्यत असायची. आईने अगदी तयार करून शाळेला पाठवलेल्या तिच्या पिल्लाचा शाळेत जाईपर्यंत पूर्ण अवतार बदललेला असायचा. चड्डीतून बाहेर आलेला शर्ट, एका खांद्यावरून खाली सरकलेलं दप्तर , विस्कटलेले केस , घामाघूम.....याच अवतारात शाळेनी मला जास्त वेळा पाहिलंय . त्यात उशीर झाला कि सकाळी सकाळी हातावरती छडी मिळायची..ती छडी चुकवण्यासाठी ती शर्यत.
      पहिली घंटा वाजायची. घंटा वाजण्याच्या दुसऱ्याच क्षणाला सगळे आपल्या वर्गाच्या रांगेत जमायचे. धावपळ करत असलेले सगळे रांगेत उभे राहण्यासाठी ढकला ढकली करायचे. रांगांची जागा ठरलेली असायची. त्या रांगेत आमची जागा पण उंची नुसार ठरलेली असायची. पण जागेसाठी भांडण होणारच !! “परेड सावधान !!! विश्राम !! सावधान !! एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर् ” सोबत “ जन गण मन...” सुरु व्हायचे . त्याच्या पाठोपाठ प्रार्थना (हे प्रभो आनंद दाता ज्ञान हमको दिजीये , शीघ्र सारे दुर्गुनोंको दूर हमसे किजीये...) , प्रतिज्ञा (भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत...) , पद्य (इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...) , भगवद्गीतेचा १५ वा अध्याय ( ऊर्ध्वमुलमधःशाखम‌‍‌‍‍‍‌‌‌‌‌‌‌‌श्वसथं प्राहुरव्यम् ) हे सगळं पाठांतर म्हणताना सगळ्यांचा प्राण अगदी कंठात आणला जायचा. सगळी शक्ती लाऊन म्हणलेल्या आमच्या गद्य-पद्याने सगळी शाळा हादरायची..त्या भिंतींच्या आतपर्यंत आमचा आवाज जाऊन रूतून बसला असेल...
      दुसरी घंटा असायची ती मधल्या सुट्टीची....ती वाजताच सरळ उडी मैदानात...कागदाच्या खेळांचे विलक्षण वेड मला कसे लागले माहित नाही..त्याच कागदांनी बनलेल्या माझ्या विमानाने शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात मनसोक्त भरारी घेतली होती. कागदाचे ससे, कासव, होडी, गुलाबाचे फुल, विमान अश्या खेळण्यात मन कसे रमत होते कुणास ठाऊक. त्याच सुट्टीत शिवणापाणी सारखे खेळ खेळण्यात सगळी शक्ती खर्च करायची आणि जेवायची पंगत बसायची. हो “पंगत”. मैदानातल्या एका झाडाखाली माझ्या वर्गाची एक मोठ्ठी गोल पंगत बसायची. मग देवाण घेवाण, सांडासांड , करत आम्ही जमिनीवरच जेवायला बसायचो..त्या जमिनीची माती कित्तेकदा डब्ब्यात मिसळून पोटात गेली असेल , पण भान कुणाला असायचे... त्या मधल्या सुट्टीत आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे घरून मिळालेले पैसे. मामा, आजोबा घरी आले कि आले पैसे माझ्या खिशात....पैसे कसले , एक किंवा दोन रुपयाचा बंदा तो !! त्या दोन रुपयात घेण्यासारख्या इतक्या गोष्टी असायच्या कि अगदी प्रश्न पडायचा नेमकं घ्यायचं काय ? चॉकलेट , गोळ्या , मीठ लावलेले पेरूचे तुकडे , बोरं , जांभळे , खारे बिस्कीट , पेप्सी , खारेमुरे , मुरकुल , कोरडी भेळ अश्या कित्तीतरी गोष्टी फक्त एक रुपयात घेता येण्यासारख्या होत्या. पण तो एकच रुपया खिशात येण्यासाठी महिना महिना लागायचा.
      तिसरी घंटा असायची शाळा सुटण्याची. घरी डब्ब्यात ठेवलेल्या गोट्या जणू हाक मारायच्या. त्यांना प्रतिसाद दिल्यासारखा मी घराकडे धावत सुटायचो. कधी रस्त्यावरच्या गाड्या मोजत , कधी एकेरी विटेच्या भिंतीवर थांबून अंगाचा तोल सांभाळायचा खेळ खेळत, कधी प्लास्टिकच्या डब्ब्याला पायाने ढकलत , कधी दोन डब्यांना ढकलत मी घरापर्यंत यायचो. सकाळी पांढराशुभ्र असलेला शर्ट दुपारी घरी येईपर्यंत काळा झालेला असायचा. त्या काळ्या शर्टासाठी मग आई उगीच रागावल्यासारखं करायची आणि थोड्यावेळाने घास भरवायची. जेवण झाले नाही झाले कि लगेच घराबाहेर आणि पूर्ण उन्ह डोक्यावर.मग थेट भूक लागल्यावर घर आठवायचे..
      शाळेत असताना मला आवडणाऱ्या गोष्टी मी खूप जपून ठेवायचो. घरातल्या एका छोट्या कोनाड्यात झाकून ठेवायचो. हळूहळू मिळत गेलेल्या नव्या प्रकारच्या चित्रकलेच्या वह्या , रंगीत खडू , रंगाच्या वड्या , कॅमल कंपनीची कंपास पेटी ,वेगवेगळ्या पेना , कांड्यांचे पाकीट , रुलिंग ताव , नवीन वह्या , गोष्टींची पुस्तके या साऱ्यांची खूप किंमत वाटायची मला...ते जपून ठेवण्याची आणि मिळेल त्याचा चांगला उपयोग करण्याची सवय होती.
      नवीन वर्गात गेल्यावर नव्या सहा विषयांसाठी मिळणाऱ्या सहा वह्यांचा सुगन्ध , त्यांच्या पहिल्या पानावर सुंदर अक्षरात नाव काढण्याचे प्रयत्न हे सगळं खूप मन लाऊन केल जाई . दरवर्षी नवीन वर्ग , वर्गातली नवी जागा , बाकावरचा मित्र , खेळाचा आणि चित्रकलेचा तास , नवे वर्ग शिक्षक , नवा मॉनिटर , मधली सुट्टी , डब्यांची देवाण घेवाण , सूर्यनमस्कार....हे सगळं चालत राहील.....हळूहळू शाळेत जायला सायकल आली , नविन जास्त कप्प्यांचे दप्तर आले, पत्तीचा पेन आला , कंपासपेटीत दोन तीन रंगांच्या पेना आल्या, सहावीला पहिली पॅंट आली , शाळेतून मिळालेली पुस्तके सोडून बाजारातली गाईड्स आली...
      दहा वर्ष हे नाविन्य चालत राहिले. त्या दहा वर्षाच्या प्रवासाचा कधीच कंटाळा आला नाही. कधीच काहीतरी चुकतंय असा वाटलं नाही . कधीच भविष्याची काळजी वाटली नाही . निर्णय घायला भाग पाडणारे प्रसंग आले नाही , तब्यतीची काळजी वाटली नाही , शर्यती हारण्याची भीती वाटली नाही . लोक काय म्हणतील याची चिंता नाही...
      आजही शाळेसमोरून जाताना तो प्रार्थनेचा आवाज कानात घुमतो.  राष्ट्रगीत म्हणणाऱ्या लहान लहान मुलांकडे पाहाताना अंगावरती काटा येतो. गर्दीत एकमेकांना मुद्दाम ढकलणाऱ्या मुलांमध्ये घुसून गोंधळ करावा वाटतो. मागच्या बाकावर बसून समोरच्यांना खडू फेकून मारावा वाटतो. वाटून खालेल्या डब्याची पंगत मांडावी वाटते. शाळा सुटल्यावर “शाळा सुटली रे...” म्हणत घराकडे पाळावं वाटतं. दोन रुपयांसाठी खूप हट्ट करावा वाटतो .....
येईल का हो ते सगळं परत ???????

सहजच मला माझी "पाटी" आठवली.. सहजच मला माझी "पाटी" आठवली.. Reviewed by Akshay on 11:56 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.