ग आई...





दुसऱ्या गावी गेल्यामुळे मागच्या आठवड्यात मला सतत दोन दिवस आईला बोलता आलं नाही. तिसऱ्या दिवशी आईने स्वतःच मला कॉल केला आणि काहीतरी बोलली..तिची तक्रार होती माझ्याकडे कि मी तिला विसरतोय..तिचे तक्रार करणे अगदी साहाजिक आहे पण तिला मला काहीतरी सांगायचे आहे
 तुझाच होतो ग आधी मी आई , दूर इतका कसा गेलो , मलाच कळत नाही.
डोळे मिटुन , पाय पोटाशी दुमडून , हाताची बोटे आवळून, छोट्या छोट्या हालचाली करायचो. पोटात होतो मी तुझ्या. पोटात असताना लाथ मारायचो तुला. पण हालचाल करतंय बाळ म्हणुन तुच सांगायचीस सगळ्यांना. तुला मला पहायचं होतं . तुझ्याच जिवातून तयार झालेल्या पोटातल्या गोळ्याला इतक्या वेदना सहन करून मग तू तुझ्यापासून वेगळं केलसं. वेदनांकडे तर लक्षच नाही, पण मला पाहिलंस म्हणून तूच रडली होतीस  ना ?
खुप वेळा पडलो , रडलो कितीदा . पण तुझ्या हातातून उतरून मी चालावं हि तुझीच इच्छा होती नं....कडेवरून तुझ्या तु जमिनीवर उतरवलं , हाताचा आधार देत चालायला शिकवलं , धडपडत चार पाऊल टाकुन जेव्हा मी पडलो , खुप रडलो. पण पाहिलं पाऊल टाकलं म्हणुन तूच हसली होतीस ना ?
      तू भरवायचीस घास म्हणुन जेवायचो घरात . पण डब्बा देऊन शाळेत तूच पाठवायचीस ना ? शाळेत जायचो मी. दिवसभर आई आई म्हणणारा मी तुझ्यापासून दुर असायचो. पण शाळेत जाऊन “आ – आईचं ” म्हणायला शिकलो म्हणुन तुच सगळ्यांना सांगितलीस ना ?
      मोठ्या वर्गात गेलो. जास्त वेळ शाळेत जायचो. माझ्याशिवाय करमायचं नाही तुला . पण चांगले गुण मिळावे म्हणुन अभ्यासिकेला आणि शिकवणीला पण तूच पाठ्वायचीस ना ?
      मांडीवर डोकं ठेऊन झोपायचो तुझ्या. तू गुणगुणलेल्या गाण्याच्या आवाजात गाढ झोप लागायची मला. पण “मोठ्या कॉलेजात जायचंय तुला , अभ्यास कर” म्हणुन तूच म्हणत होतीस ना ?
      कॉलेज साठी दुसऱ्या गावी गेलो चार वर्ष. “ जेवण झालं का , काय जेवलास ” म्हणुन कितीदा विचारायचीस. पण सुट्ट्यात घरी आल्यावर “ कॉलेज बुडवू नको , जा परत ” म्हणुन तूच पाठवायचीस ना ?  मग , वर्षांमागून वर्ष गेले. पण प्रत्येक वेळी “ चांगला अभ्यास कर , चांगली नौकरी लागेल ” म्हणुन तूच म्हणायचीस ना ?
      नौकरी लागलीय मला आता. कधी ८ तास तर कधी १० तास काम करतो . वेळ मिळालाच तर कधी घराबाहेर जातो. सुट्टीचा दिवस तर कपडे धुता धुता रात्रीला जाऊन मिळतो. कधीतरी एक सिनेमा किंवा एखाद्या पार्टीमध्ये उरलेला वेळ पण जातो. ऑफिसातले काम , मित्र – मैत्रिणी , आणि हे सगळं करता करता कधी रात्र होते समजत नाही.
      जन्म देऊन स्वतःपासून वेगळं केलंस , चालायला शिकवून जमिनीवर उतरवलं , शाळेत पाठवून घराबाहेर जायला शिकवलंस , कॉलेजात टाकुन गावाबेर राहायला शिकवलंस , नौकरी करायला सांगून दुसऱ्या गावी घर घेऊन राहायला सांगितलंस .   “हरू नको कधी” म्हणुन तूच मला या स्पर्धेत उतरवलं होतं. प्रत्येक वेळी “जा पुढ जा” म्हणत राहिलीस . पण त्या स्पर्धेच स्वरूप इतका मोठ असेल हे कदाचित तुलापन माहित नव्हतं. त्या स्पर्धेत जिंकता जिंकता मी तुझ्या इतक्या दुर जाईल असं तुलापण कदाचित वाटलं नसेल. आता मी दुर गेलोय. मला सवय लागलीय , कुठेही राहायची , मिळेल ते खायची , मिळेल तेवढ काम करायची..
      तुझी मी दुर गेल्याची तक्रार मला मान्य आहे , पण तुपण माझ्यापासून तितकीच दुर गेली नाहीस का ? मला तरी कुठं मिळतोय तो मायेचा पदर ? मला तरी कोण गाणे म्हणत झोपवतय ? मला तरी कोण आवडत्या पक्वान्नाचा घास भरवतय ? “माझ्या राजा किती मोठ्ठा झाला” म्हणुन कोण पाठीवरून हात फिरवतय ? भीती वाटते मग ... बाहेर राहून आयुष्य काढण्यामागची वास्तविकता पाहणे खरच अवघड जातंय . या स्पर्धेत जिंकण्यासाठी मला जर तुला हरवावं लागत असेल तर हि स्पर्धाच नको मला....


ग आई... ग आई... Reviewed by Akshay on 5:08 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.