दंड नाही भरला तरी चालेल पण पैसे भरा...


मागे एकदा रविवार पेठेत जाण्यासाठी घरातून निघालो.
बाजीराव रस्त्यावरून रविवार पेठेकडे जाण्यासाठी एका छोट्या अरुंद गल्लीत रस्ता मोकळा बघून गाडी घुसवली.
रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला मोठा चौक दिसला. गाडी चौकात मी आणलीच असेल इतक्यात समोर माझे स्वागत करावे अशा आवेशाने एक वाहतूक नियंत्रण करणारा हवालदार उभा होता..त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन मला परिस्थितीची चाहूल लागलीच होती इतक्यात दत्त म्हणून तो माझा गाडी समोर उभा राहिला .

वाकय रचना माहित नसलेले मुल जसे एका शब्दात पूर्ण वाक्याचा आशय बोलते त्याप्रमाणे हवालदार म्हणाला “लायसन्स!!”
“काय झालं साहेब?” म्हणत मी नेमका कुठला गुन्हा झाला असेल याचा अंदाज लावत होतो.             
“राँग साईड” म्हणून परत एका शब्दात त्याने माझ्या गुन्ह्याचा उजाळा केला.
“राँग साईड? बोर्ड तर दिसला नाही न साहेब मला.” नेहमीप्रमाणे कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्यात दडपुन ठेवलेल्या बोर्डाची तक्रार करत मी बोललो.
परत “लायसन्स” म्हणून त्याने हात पुढे केला.
मी लायसन्स काढून त्याच्या हातात दिले.
“परत जाऊन बघुन ये बोर्ड. एक सोडून तीन लावले आहेत.” माझे नाव, गाडीचा नंबर एका कागदाच्या तुकड्यावर लिहित हवालदार म्हणाले.
“बापरे! एक सोडून तीन बोर्ड आहेत आणि मी एकाकडे पण पहिले नाही”...मागे वळून पाहताना मी स्वतःशी पुटपुटलो.
“२०० रुपये दंड भरा.” एकदम पोलीसी ठसक्यात साहेबांनी सजा सुनावली.
“दोनशे? इतके?” गुन्हा तर झाला आहे पण कदाचित हवालदाराला आपली दया यावी म्हणून मी प्रयत्न केला. “इकडुन पहिल्यांदाच आलो साहेब, रस्ता माहित नव्हता म्हणून चूक झाली.परत होणार नाही. हवे तर उलटा जाऊन दुसऱ्या रस्त्यांनी येतो.”
साहेब काही न बोलता चौकाकडे वळले . आधी पकडलेले एक दोन बकरे दुसऱ्या बाजूला थांबले होते. कदाचित तेही हवालदाराकडे दया याचिका करत असतील असे त्यांच्याकडे बघुन वाटले.
गाडीवरून उतरून मी साहेबांच्या जवळ गेलो.
साहेब चौकात लावलेल्या cctv कॅमेराकडे बोट दाखवत म्हणाले “कॅमेरा लावलेला आहे बाबा , सोडता येत नाही , पटकन दंड भरा नाहीतर तिकडे थांबलेले मोठे साहेब अजून दंड मागतील.”
“पण २०० ?इतके ?”
“ये ..१०० भर आणि चल लवकर..” कडक शब्दात उत्तर मिळाले.
गुन्हा झाला होता...नाईलाज होता...१०० काढून साहेबांच्या हातात ठेवले..
साहेबांनी नोट खिशात घातली आणि आधी पकडलेल्या बकऱ्यांकडे वळले.
मी पावती भेटेल या आशेने त्यांच्याकडे बघत राहिलो.
साहेब काही जागेवरून हालले नाहीत. मी जवळ जाऊन म्हणालो “साहेब पावती ?”
“पावती नाही , जा नाहीतर अजुन दंड भरावा लागेल.”
“साहेब परत मी सापडलो तर दंड लागेल मला , पावती द्या ” वगेरे गोष्टी बोलल्यावर अखेर त्यांनी पावती दिली.

साधा प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला, "माझ्याकडुन दंड वसूल करण्यासाठी कॅमेरा होता पण पावती न देता खिशात घालताना कॅमेरा नव्हता का ?"
सगळे जरी असे नसतील तरी मला भेटलेले तरी सगळेच पोलीस असेच होते..पैसे खाऊ, पावत्या न देणारे, ५० रुपये दे आणि जा म्हणणारे, जास्त बोललास तर जास्त दंड लागेल इत्यादी पोलीसगीरीचे दाखले देणारे.
तोंड बघुन, मानसे बघुन नियम आणि दंड बदलतात...

यासाठी केंद्रात/राज्यात असलेले सरकार कारणीभूत आहे का ? यांना पगार कमी असेल का? दिवस भर उन्हात , धुळीत, कर्णकर्कश्य आवाजात थांबावे लागते म्हणून हे असे वागतात का असे प्रश्न पाठोपाठ मला पडत राहिले..आणि मी रविवार पेठेत पोहोचलो..

दंड नाही भरला तरी चालेल पण पैसे भरा... दंड नाही भरला तरी चालेल पण पैसे भरा... Reviewed by Akshay on 8:48 AM Rating: 5

1 comment:

  1. Glad to see your blog in Marathi. Kindly manually edit your blog permalink before publishing article to get more traffic.

    ReplyDelete

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.