उलटलेल्या कागदाच्या होड्या....

पाऊस

घरात कुणीच नव्हतं. मला गाढ झोप लागली होती. झोपेत स्वप्न पडलं. अंधुक आठवतं ते स्वप्न.
काही लहान मुले कुठेतरी काहीतरी शोधात होती .सगळ्या पोरांची फक्त पाठमोरी प्रतिमा दिसत होती. चेहरे दिसत नव्हते..त्या घोळक्यात मी पण होतो. गुढग्यापर्यंतची विजार आणि गोऱ्या काटकुळ्या पायावर उंच शरीर. मी माझ्याच भूतकाळातल्या प्रतिमेला मागून पाहत होतो. स्वप्नात अचानक जोऱ्याचा वारा सुटला. धूळ उडायला लागली आणि हलक्या पावसाची सुरुवात झाली. त्या घोळक्यातला कुणीतरी ओरडला “पाळा रे! पाऊस पडतोय.” सगळे पाळायला लागले. त्यात मी पण होतो. पळत पळत अडोशापर्यंत पोहोंचेपर्यंत मी पूर्ण भिजलेला गहोतो. केसांमधून पाण्याचा ओघळ चेहऱ्यावर आला. चेहऱ्यावरचे पाणी पुसण्यासाठी मी हात वर केला इतक्यात कुणीतरी माझा हात धरला. एक छोटी मुलगी होती. माझ्याच वयाची असेल. तिच्या हातात पिवळा आणि लाल अश्या दोन रंगांच्या कागदाच्या होड्या होत्या. तिने अडोशाच्या बाजूने उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याकडे हात दाखवला आणि ती तिकडे चालायला लागली. तिच्या मागोमाग मी पण गेलो. ती भिजलेली होती. तिने लाल होडी पाण्यात सोडली आणि मला पिवळी होडी पाण्यात सोडायला सांगितली. लालच्या मागे पिवळी अश्या पाठोपाठ होड्या पाण्यात चालायला लागल्या. जोऱ्याच्या वाऱ्याने पावसाचा सडा झपकन होड्यांवर आला. क्षणात दोन्ही होड्या उलट्या पडल्या आणि मला दचकुन जाग आली.
            डोळे उघडले आणि बघतोय तर बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. छपरावर पडणाऱ्या पावसाने रपरप असा मोठा आवाज येत होता. या आवाजानेच स्वप्नात पाऊस सुरु झाला असेल.
            उठून खिडकी जवळ गेलो. बाहेर चिंब भिजलेलं गाव दिसत होतं. नाले रस्ते पाण्यात बुडून गेले होते. पावसाशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. रस्त्यावर दूरपर्यंत कुणीच नव्हत. बराच वेळ खिडकीजवळ मी तसाच उभा होतो. मनातली चलबिचल थांबत नव्हती. खिडकी बाहेरचा वास्तविक पाऊस आणि स्वप्नातला काल्पनिक पाऊस एकदाच मला भिजवत होता. खिडकीत उभा असलेला मी आणि स्वप्नात भिजलेला मी समोरा समोर उभे आहेत असे वाटत होते. स्वप्नातल्या माझ्या लहान रूपाला मी अजूनही पाठीमागुनच पाहतोय असा भास होत होता. चेहरा दिसतंच नव्हता. डोळे बंद केले कि स्वप्नातला तो पाऊस, ती लहान मुले, लहानगा मी, ती मुलगी, उलटलेल्या होड्या एकसारख्या डोळ्यासमोर येत होत्या. आणि डोळे उघडले कि खिडकीच्या बाहेर धो धो पावसात भिजणारे गाव आणि खिडकीच्या आत मी दिसायचो.
            थोड्या वेळात वास्तविक आणि काल्पनिक द्र्श्यातले अंतर अगदी संपले होते. दोन्ही प्रसंगांची डोक्यात इतकी साम्यता झाली कि स्वप्न कोणते आणि वास्तविकता कोणती हे समजत नव्हते. माझी स्वतःची ओळख मी विसरलो होतो. फक्त खिडकीच्या बाहेरचे पावसात भिजणारे गाव, खिडकीच्या आत मी आणि स्वप्नातले दृश्य इतकेच जग आहे असे वाटत होते. स्वतःला विसरून या दोन प्रसंगांना मी आलटून पालटून पाहत होतो.
            हे चालू असतानाच दाराची घंटा वाजली. भल्यामोठ्या काचेच्या भिंतीवर दगड मारावा त्यासारखे विचार शृंखलेचे तुकडे तुकडे झाले. मी वास्तव जगात आलो आणि दार उघडले. “ही” आली होती.
मी विचारले , “कुठे गेली होती?”.
“तू झोपला होता, म्हंटल शेजाऱ्यांकडे जाऊन यावं. कधी उठला ? गोंधळल्यासारखा का वाटतोयस ?”
“आत्ताच जागा झालो. स्वप्नात तू आली होती. मग एकदम जाग आली”
“हो का~~ ?” हसून ती म्हणाली..
तिला मिठीत घेऊन परत त्याचं खिडकीजवळ आलो. भिंतीला डोकं टेकवलं आणि बाहेर लक्ष गेलं.
पावसात शांतपणे ती माझ्या मिठीत विसावली होती. पण माझ्या मनात प्रश्न चालूच होते..
‘ती छोटी मुलगी कोण होती? तिचा चेहरा का आठवत नाही ? स्वप्नात मला माझा चेहरा का दिसला नाही..’
उलटलेल्या कागदाच्या होड्या.... उलटलेल्या कागदाच्या होड्या.... Reviewed by Akshay on 1:47 PM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.